एक तालुका,एक गणपती
भूम : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘एक गाव, एक गणपती’ नव्हे तर ‘एक तालुका,एक गणपती’ हा अभिनव उपक्रम भूम पोलिसांनी राबविला आहे.
भूम शहर तसेच भूम तालुक्यामध्ये सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे.सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये गर्दी होऊन कोरोनाआजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता असून आणि त्याची झळ अनेकांना बसू शकते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन समाजाच्या सुरक्षिततेसाठी भूम तालुक्यातील सर्व गणेश मंडळ व गावकर्यांशी चर्चा करून त्यांनी उत्स्फूर्तपणे सहमती व सहकार्य दर्शविल्यामुळे संपूर्ण गावांचा ‘एकच सार्वजनिक गणपती’ भूम पोलीस स्टेशन समोर बसविण्यात येणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान कोरोना सारख्या आणीबाणीच्या स्थितीत तालुक्यांमध्ये गणेश मंडळाच्या सहकार्याने सामाजिक संदेश देणारे उपक्रम व शिबिरे राबविण्यात येणार आहेत.
तालुक्यात शहरासह ५२ गावांचा समावेश असून सुमारे ५० हून अधिक लहान मोठी मंडळे आहेत. या उपक्रमाला सर्वानी एकमताने सहमती दर्शविली. त्यामुळे भूम पोलीस ठाण्याच्या समोर संपूर्ण तालुक्याचा मिळून एकच गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे.